अकोला : कोविड लसीकरणाला सर्वच वयोगटातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यात लसीकरण प्रभावित होत आहे. कासवगतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत सोमवारी विभागाला १ लाख २७ हजार ४१० डोस प्राप्त झाले असून, यामध्ये ८६ हजार ८१० डोस केंद्र शासनामार्फत, तर ४० हजार ६०० डोस राज्य शासनामार्फत पाठविण्यात आले आहेत. यामध्ये कोव्हॅक्सिनचा पुरवठा अत्यल्प असल्याने दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांच्या हाती पुन्हा निराशाच येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत ४५ वर्षांवरील लाभार्थींना केंद्र शासनामार्फत, तर ४५ वर्षांखालील लाभार्थींसाठी राज्य शासनामार्फत लसीचा साठा पाठविण्यात येतो. या नुसार, केंद्र शासनामार्फत सोमवारी कोविशिल्डचे ८० हजार ७००, तर कोव्हॅक्सिनचे ६११०, असे एकूण ८६ हजार ८१० डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच राज्य शासनामार्फत ४५ वर्षांआतील लाभार्थींसाठी ४० हजार ६०० डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांच्या हिश्शाला केवळ दोन दिवस पुरेल येवढाच साठा येतो. त्यामुळे बुकिंगसाठी धडपड करणाऱ्या लाभार्थींना लस मिळणेही कठीण झाले आहे.
जिल्हानिहाय लस
४५ वर्षांवरील लाभार्थींसाठी
जिल्हा - कोविशिल्ड - कोव्हॅक्सिन
अकोला - ९१०० - ९१०
अमरावती - १९००० - १२७०
बुलडाणा - १९७०० - १३८०
वाशिम - ६८०० - १६६०
यवतमाळ - २६,१०० - ८९०
४५ वर्षांखालील लाभार्थींसाठी
जिल्हा - कोविशिल्ड
अकाेला - ८७००
अमरावती - ८७००
बुलडाणा - ८७००
वाशिम - ५८००
यवतमाळ - ८७००