पातूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात ५ फेब्रुवारीपासून कोरोना लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दररोज किती कोरोना लस देण्यात आल्या, याबाबत कोरोना व्हॅक्सिनचे मोजमाप करून त्या कोविड कक्षात ठेवल्या जात असत. परंतु १२ फेब्रुवारी रोजी सात कोरोना व्हॅक्सिन लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्रकार उघडकीस आल्याच्या चार दिवसांनंतर १६ फेब्रुवारी रोजीच्या रात्री उशिरा कोरोना व्हॅक्सिन गहाळ झाल्याबाबतची तक्रार चान्नी पोलीस ठाण्यात देण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, ग्रामीण रुग्णालयाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हा प्रकार घडला आहे. रुग्णालयात २४ तास सेवा देण्यासाठी अधिकारी, कर्मचारी उपस्थित असतात. परंतु सदर प्रकार घडल्याने, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी एवढे गाफील कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजकीय स्तरावर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न !
कोरोना व्हॅक्सिन चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आला. त्याच दिवशी पोलिसांत तक्रार देणे अपेक्षित होते. परंतु सदर प्रकरण राजकीय स्तरावर दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर मंगळवारी रात्री उशिरा कोरोना व्हॅक्सिन गहाळ झाल्याबाबतची तक्रार चान्नी पोलीस ठाण्यात देण्यात आली.
फोटो:
रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर !
ग्रामीण रुग्णालयात २४ तास सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतात. असे असतानाही सात कोरोना व्हॅक्सिन चोरी जाण्याची बाब गंभीर आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.
कोविड कक्षातून सात कोरोना व्हक्सिन गहाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर, कोरोना व्हॅक्सिनची शोधाशोध सुरू झाली. व्हॅक्सिन न मिळाल्यामुळे मंगळवारी रात्री चान्नी पोलिसांकडे तक्रार दिली.
-डॉ. स्वप्नील माहोरे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चतारी
कोरोना व्हॅक्सिन चोरी झाल्याबाबतची तक्रार मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाली आहे. चौकशी सुरू आहे. चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
-राहुल वाघ, ठाणेदार, पोलीस स्टेशन, चान्नी