लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत दीड महिन्यात ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला असून, अकोला शहरात तुलनेने कमी रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ३,३५५ रुग्णांपैकी १,३०३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत, तर २,०३७ रुग्ण शहरी भागातील आहेत.जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, कोरोनाबाधितांचा आकडा ३,३५५ वर पोहोचला आहे. मे, जून महिन्यात कोरोनाने अकोला शहरात धुमाकूळ घातला होता; मात्र जुलै महिन्यात ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविणे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान झाले आहे. त्या अनुषंगाने गत दीड महिन्यात ग्रामीण भागात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३६ हजारांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या असून, त्यापैकी १८,६०० पेक्षा जास्त चाचण्या ग्रामीण भागातील असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.