अकोला : चीनमधून जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आरोग्य विभागाकडून वॉच ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी आरोग्य विभागाची व्हिडिओ कॉन्फरंसी झाली असून, राज्यभरातील सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.राज्यात सध्यातरी कोरोना व्हायरसचा पॉझिटीव्ह रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांनी जास्त घाबरण्याची गरज नाही; परंतु या व्हायरसपासून स्वत:च्या बचावासाठी सावध राहणे गरजेचे आहे. अशातच चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी व व्यापारी परतले आहेत. जिल्ह्यातील अशा विद्यार्थ्यांसह व्यापाऱ्यांवर आरोग्य विभागाचे लक्ष राहणार आहे. त्यांची प्रकृती चांगली असली, तरी त्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासोबतच नागरिकांनी चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर भर द्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. सर्दी, खोकल्यासह तापाची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहनदेखील आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. कोरोनाच्या संशयीत रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयात दहा खाटांच्या स्वतंत्र वार्डची निर्मिती करण्यात आली असून, त्यासाठी सहा परिचारिकांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.स्वत:ला व इतरांना सुरक्षित ठेवा
- नियमित स्वच्छ हात धुवा.
- शिंकताना व खोकताना नाकावर व तोंडावर रुमाल धरा.
- सर्दी किंवा फ्लूसदृश लक्षणे असणाºया रुग्णांशी जवळीकता टाळा.
- मांस अंडी पूर्णत: शिजवून व उकडून घ्या.
- जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा.
राष्ट्रीय कॉल सेंटर९१११२३९७८०४६राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष०२०-२६१२७३९४टोल फ्री हेल्पलाइन१०४कोरोना व्हायरसचा धोका पाहता नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, तसेच स्वच्छता बाळगण्याची गरज आहे. चीनमधून आलेल्या व्यापारी व विद्यार्थ्यांवर आरोग्य विभागाचे विशेष लक्ष राहणार असून, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरंसीद्वारे राज्यभरात सर्वत्र सूचना देण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी केली जात आहे.- डॉ. रियाज फारुकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला.