अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत असताना आता मृत्युसत्रही सुरू झाले आहे. सोमवार, ३१ जानेवारी रोजी आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर ५५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. दरम्यान, १९२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
संपूर्ण जानेवारी महिन्यात कोरोना संसर्गाचा आलेख चढताच असून, मृत्यूचे प्रमाणही वाढते राहिले. सोमवारी न्यू तापडिया नगर भागातील ७२ वर्षीय पुरुष, पातूर तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुष व गोरक्षण रोड, अकोला येथील ७० वर्षीय महिला अशा तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. या तिघांनाही अनुक्रमे २३, २९ व ३१ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. व्हीआरडीएल प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या १५२ आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४१ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. खासगी प्रयोगशाळेत १२, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.
असे आढळले रुग्ण
सोमवारी आढळलेल्या ७७ रुग्णांपैकी ३७ जण हे अकोला शहरातील आहेत. अकोला तालुक्यातील एक, पातूर येथील दोन व बार्शिटाकळी येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
१,५१४ सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत ६४,०५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ६१,३८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर १,१५६ जण मृत्युमुखी पडले आहेत. सद्य:स्थितीत १,५१४ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.