अकोला: शहरातील सिंधी कॅम्प परिसरात भाजपचे नगरसेवक हरीश आलिमचंदानी यांच्या पुढाकारातून या भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीला शनिवारपासून प्रारंभ करण्यात आला. यावेळी ८३ नागरिकांची तपासणी केली असता यापैकी ४८ नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत.शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता, यावर नियंत्रण आणण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार शहरातील सिंधी कॅम्पस्थित सिंधू युवा हेल्थ क्लबमध्ये या परिसरातील नागरिकांच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीला शनिवारी प्रारंभ करण्यात आला. याकरिता भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलिमचंद्वानी यांनी पुढाकार घेत हेल्थ क्लबची जागा उपलब्ध करून दिली. या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील डॉ. सारिका राजुरकर, डॉ. तृप्ती तिजारे यांच्याद्वारे एकूण ८३ नागरिकांची तपासणी करण्यात आली असता, यामध्ये ४८ नागरिकांना कोरोनासदृश लक्षणे आढळून आली आहेत. यावेळी संबंधित नागरिकांना त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्याचे निर्देश दिले आहेत. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला. यावेळी नगरसेवक हरीश आलिमचंदानी, दीप मनवानी, कन्हैयालाल रंगवानी, मनपा क्षेत्रीय अधिकारी संदीप गावंडे, अतुल दलाल तसेच दक्षिण क्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
अकोलेकरांनो, माहिती देण्यासाठी समोर या!कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोलेकरांनी स्वत:ची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रभागात किंवा घराच्या परिसरात कोरोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती असल्यास त्वरित महानगरपालिकेच्या टोल फ्री क्रमांक व हेल्पलाइन 18002335733, 0724-2434412, 0724-2423290, 0724-2434414, 0724-2430084 या नंबरवर देऊन सहकार्य करण्याचे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे. माहिती देणाºयाचे नाव गोपनीय ठेवल्या जाणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.