नागपूर/ अकोला : विदर्भात कोरोनाच्या प्रादुर्भावाला अडीच महिने लोटले तरी रुग्ण व मृत्यूची संख्या नियंत्रणात नसल्याचे चित्र आहे. रविवारी आणखी अकोला जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू व ४६ नव्या रुग्णांची नोंद झाली. विदर्भातील एकूण रुग्णसंख्या १७०० वर गेली असून मृतांची संख्या ६६ झाली आहे. अकोल्यात एका ३८ वर्षीय डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अकोल्यात पॉझिटिव्ह आलेल्या महिलेवर नागपुरात उपचार सुरू असताना रविवारी मृत्यू झाला.
५६ वर्षीय या महिलेला मूत्रपिंडाचा कर्करोग, मधुमेह व रक्तदाबाचाही विकार होता. या महिलेची २५ वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह आली आहे तर डॉक्टर असलेल्या तिच्या मुलाला वॉर्डात दाखल केले आहे. नागपुरात १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ५४० झाली आहे. अकोल्यात ११ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णसंख्या ५८१ वर पोहचली आहे. गडचिरोलीत एक रुग्ण आल्याने रुग्णसंख्या ३५ झाली.
मुंबईवरून यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील नागापूर गावामध्ये आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह होती. तिचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला.यवतमाळमध्ये एक मृत्यूमुंबईतच पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाला त्याच्या नातेवाईकांनी मुंबईवरून यवतमाळात आणले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा एकच मृत्यू नोंदविला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भंडारा जिल्हयात रविवारी आणखी दोन कोरोनाबाधित आढळल्याने एकूण संख्या ३१ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात रविवारी आणखी एका रुग्णाची भर पडल्याने बाधितांची संख्या ६७ झाली आहे. शनिवारपर्यंत ३२ आणि रविवारी ६ कोरोनामुक्त झाल्याने आता २९ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.