- संतोष गव्हाळे
हातरुण (अकोला) : चीनमधील कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विवाह सोहळ्याला नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा भाग म्हणून होणारी विवाह सोहळ्यातील गर्दी टाळण्याकरिता रविवारी अश्विनी आणि मनोज यांनी आदर्श विवाह करून समाजाला एक आगळावेगळा संदेश दिला आहे. बाळापूर तालुक्यातील सस्ती येथील रघुनाथ राऊत यांची मुलगी अश्विनी यांना पाहण्यासाठी खामगाव येथील भागवत सुलतान व त्यांचा मुलगा मनोज आले होते. मुलगी पाहण्याच्या कर्यक्रमात एकमेकांची पसंती झाली आणि मुलगी पाहताच आपल्याला कशाचीदेखील अपेक्षा नसून आपण लगेच साखरपुडा करून घेऊन असे काही पाहुण्यांनी सांगितले. त्यांनतर साखरपुड्याची तयारी सुरू झाली. कोरोना विषाणूमुळे सध्या भीतीचे वातावरण पसरले असून शासनाने शाळा, महाविद्यालये, जत्रा आणि यात्रा व चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. विवाह सोहळा आयोजित केल्यास मोठी गर्दी होणार आहे अशावेळी एखादा कोरोना संशयित रुग्ण विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूबाबत खबरदारी म्हणून दोन्ही कडील मंडळी सोबत बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी चर्चा केली. त्यानंतर साध्या पद्धतीने मनोज सुलतान आणि अश्विनी राऊत विवाह बंधनात अडकले. सध्या उपवर मुला-मुलींसाठी स्थळ पाहण्याचे काम चालू असून लग्नसराई सुरू झाली आहे. बराच काळ विवाह जमवण्यात तसेच विवाहाचे नियोजन करण्यात दिवस जातात. सोयरीक पुस्तकेतून माहिती घेऊन सुलतान व राऊत परिवाराने मुला व मुलीच्या पसंतीने आदर्श लग्न लावून दिले. हा विवाह सोहळा अकोला येथे घरघूती स्वरूपात रविवारी दुपारी पार पडला. बीई झालेले नवरदेव मनोज सुलतान आणि बी. सी. ए. झालेली अश्विनी राऊत दोघेही पुणे येथे नामांकित कंपनीत नोकरीला आहेत. कोरोना विषाणू पासून खबरदारीचा उपाय म्हणून दोघांनीही आदर्श लग्न करून नवा आदर्श निर्माण केला आहे.
आजच्या विज्ञान युगातील हायटेक जमान्यात सोशल मीडियातून कोरोना विषाणू बद्दल मोठ्या प्रमाणात माहितीची देवाण आणि घेवाण होत आहे. लग्न सोहळ्यास एखादा कोरोना संशयित रुग्ण उपस्थित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जागरूकता म्हणून साध्या पद्धतीने मनोज व अश्विनीचा विवाह झाला. विशेष म्हणजे हा विवाह जुळवण्यात कोणीही मध्यस्थ नाही.
- नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, बाळापूर.