अकोला : दहा दिवसांच्या उपचारानंतर चाचणी न करताच पॉझिटिव्ह रुग्णांना सुटी दिली जाते. त्यामुळे अनेक जण सुटकेचा नि:श्वास सोडतात; मात्र उपचारानंतरही रुग्णांना थकवा कायम राहतो. शिवाय रुग्णांना ताप, अंगदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बरे झाले असाल, तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णांनी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टर देतात.जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा ६,५३२ वर पोहोचला असून, यातील ४,७३२ रुग्ण बरे झाले आहेत. अकोलेकरांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी धोका टळलेला नाही. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीला निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच रुग्णाला रुग्णालातून सुटी दिली जात होती. त्यामुळे अनेक रुग्ण १५ ते २० दिवस रुग्णालयात भरती राहत असत; परंतु नव्या मार्गदर्शक सूचनानुसार रुग्णांना निगेटिव्ह अहवालाऐवजी लक्षणे दिसल्याच्या १० व्या दिवशी रुग्णालयातून सुटी दिली जाते आहे. त्यामुळे ताप, खोकला, अशी लक्षणे नसल्याची खात्री करूनच रुग्णांना सुटी दिली जाते; मात्र रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर काही रुग्णांना ताप, अंगदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास उद््भवत असल्याच्या तक्ररी राज्यात काही ठिकाणी दिसून येत आहेत. अकोल्यात आतापर्यंत असा प्रकार घडला नसला, तरी सुटी झाल्यानंतर रुग्णांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
सुटी झालेल्या रुग्णांनी ही खबरदारी घ्यावी
- आयसोलेशनच्या काळात घरातच राहावे
- घरातही मास्कचा वापर करावा
- नियमित आॅक्सिजनची पातळी तपासावी
- सॅनिटायझरचा वापर करावा
- इतरांपासून अंतर राखावे
- कोमट पाणी प्यावे
- पुरेशी झोप घ्यावी
- अतिश्रमाची कामे टाळावी
- महत्त्वाचे कामे टप्प्याटप्प्याने सुरू करावे
- काही त्रास जाणवत असेल, तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोरोनाचा रुग्ण बरा होऊन गेल्यावर पुन्हा रुग्णालयात दाखल झाल्याचा प्रकार जिल्ह्यात आतापर्यंत तरी घडला नाही; मात्र रुग्णांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे. नियमित आॅक्सिजनची पातळी तपासावे. गरज भासल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला