संजय उमक
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर - दर्यापूर - भातकुली तालुक्यांच्या सीमेवर वसलेल्या ऋणमोचन येथील यात्रेतील अन्न व वस्त्रदानाच्या ११५ वर्षांची परंपरा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडित होणार आहे. एक महिना चालणाऱ्या या यात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गाडगेबाबांचे भक्त मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. १७ जानेवारीपासून पहिला आठवडा या यात्रेचा असणार आहे.
दिव्यांग, कुष्ठरोगी, वृद्ध, निराधार व दीनदुबळ्यांसाठी कर्मयोगी गाडगेबाबा यांनी ११५ वर्षांपूर्वी सुरू केलेले सदावर्त यंदा प्रथमच खंडित होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील व दर्यापूर तालुक्यातील ऋणमोचन यात्रा रद्द झाल्यामुळे दरवर्षी होणारा अन्न-वस्त्र दानाचा कार्यक्रमदेखील रद्द होणार आहे. दर्यापूर, भातकुली, मूर्तिजापूर या तीन तालुक्याच्या सीमेवरील अर्धचंद्राकृती आकाराच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या काठावर वसलेले श्रीक्षेत्र ऋणमोचन येथे मुदगलेश्वराचे देवस्थान असून कर्मयोगी गाडगेबाबा यांनी १९०७ मध्ये अंध- अपंग यात्रेदरम्यान सदावर्ताची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांच्या पश्चात राज्यातील अनेक दानदात्यांच्या मदतीने दादासाहेब देशमुख यांनी ही परंपरा सुरू ठेवली. या सदावर्ताला वर्षाला सुमारे ११५ वर्षे पूर्ण झाले असल्याची माहिती प्रशांत देशमुख यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. १९०८ साली गाडगेबाबांनी लोकसहभागातून येथे पहिला घाट बांधला. ऋणमोचन येथे यात्रेदरम्यान पौष महिन्यातील चौथ्या किंवा शेवटच्या रविवारी गाडगेबाबा मिशनचे बापूसाहेब देशमुख यांच्या व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने अन्न-वस्त्र दानाचा महासोहळा आयोजित केला जातो. शिस्तप्रिय असा हा विलोभनीय व अविस्मरणीय सोहळा सर्वांचे लक्ष वेधून घेत असला तरी यावर्षी कोरोनाचे सावट या सोहळ्यावर पडल्याने हा कार्यक्रम व यात्रा रद्द करण्यात आली आहे.
कोरोनाचे संकट लक्षात घेता व प्रशासकीय नियमानुसार ऋणमोचन येथील नियोजित अंध, अपंग रोग्यांना औषधे, अन्न व वस्त्र दान सदावर्त कार्यक्रम रद्द करणे आवश्यक होते. यामुळे गाडगेबाबांनी सुरू केलेल्या ११५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा खंडित होणार आहे.
-प्रशांत देशमुख, मुख्य व्यवस्थापक, गाडगे महाराज धर्मशाळा, मुंबई.