लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाने गत दोन महिने अकोला महापालिका क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला होता; मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोरोनाने ग्रामीण भागाला लक्ष्य केले असून, कहर केला आहे. गत अकरा दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ३०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये १२३ महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत, तर उर्वरित १८६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.जुलै महिन्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे; पण या महिन्यात अकोला शहरात नाही, तर ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मागील दहा दिवसांत पॉझिटिव्ह अहवालातील बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. जुलै महिन्यात आतापर्यंत ३०८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ग्रामीण भागासाठी ही धोक्याची घंटा आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या आरोग्य यंत्रणेसाठीही डोकेदुखी ठरत आहे.ग्रामीण भागात बहुतांश लोक एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने कोरोनाचा फैलाव आणखी वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही; परंतु अशा भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेकडून विशेष उपाययोजना केल्या जात नसल्याचेही दिसून येत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालय आणि कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
पीएचसी, ग्रामीण रुग्णालयात हवी प्रभावी व्यवस्थाग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात प्रभावी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे; परंतु ही यंत्रणा असूनही त्याचा उपयोग होत नसल्याची वास्तविकता आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने ग्रामीण भागातील रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचार दिल्यास कोरोना विरुद्धची लढाई आणखी प्रभावी होण्यास मदत होईल.