पातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मेच्या पहिल्या आठवड्यापासूनच लॉकडाऊन घोषित केले. ३१ मेपर्यंत आता लॉकडाऊन वाढविले आहे. त्यामुळे दोन आठवड्यांपासून लिंबू मार्केट बंद आहे. त्याचा फटका तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून कोट्यवधी रुपयांचे लिंबू उत्पादन मातीमोल झाले आहेत.
महाराष्ट्रात उत्पादित केलेले लिंबू हे इतर राज्यांत निर्यात केले जातात व मोठ्या बाजारपेठांमध्ये लिंबूची मागणी मोठ्या प्रमाणात आहे व भावसुद्धा चांगले मिळत आहेत. स्थानिक व्यापारी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लिंबू विकत घेऊन इतर राज्यांत निर्यात करतात; परंतु जिल्हाबंदी, लॉकडाऊनमुळे स्थानिक व्यापाऱ्यांनीसुद्धा शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली आहे तर काही व्यापारी शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावाने विकत घेत आहेत.
फोटो:
शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ
लिंबूला भाव मिळत नसल्याने स्थानिक लिंबू उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
उन्हाळ्यात लिंबूला मागणी जास्त असते; परंतु कोरोनाने कहर केला असून शेतात राबराब राबून सुद्धा हाती काहीच उरत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष देऊन लिंबू बाजारपेठ उघडी करावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.