अकोला : कोविड रुग्णांचा भार दिवसेंदिवस वाढत असून, सर्वोपचार रुग्णालयातील व्हेंटिलेटरही अपुरे पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोनामुळे वाढता मृत्यूदर तर दुसरीकडे व्हेंटिलेटरसाठी वेटिंगवर असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आहे.कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या बहुतांश रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणे नाहीत; परंतु दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. अशातच सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण व्हेंटिलेटरसाठी वेटिंगवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अतिगंभीर रुग्ण वगळता ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांना ऑक्सिजन पॉइंटच्या माध्यमातून ऑक्सिजनची पूर्तता केली जाते; परंतु अशा वेळी काही रुग्णांना कृत्रिम श्वास देण्याची गरज असते; मात्र त्यांच्यासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे.यामध्ये बहुतांश रुग्ण हे ५० वर्षावरील असून, त्यांना कोरोनाव्यतिरिक्त इतरही आजार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तर दुसरीकडे दररोज कोरोनामुळे रुग्णांची मृत्यू होत असून, आतापर्यंत ५८ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दररोज लागतात सरासरी ३५० जंबो सिलिंडरसर्वोपचार रुग्णालयात दाखल कोरोनाच्या काही रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असून, त्यांना ऑक्सिजन पॉइंटच्या मदतीने आॅक्सिजन पुरविले जाते; परंतु हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, दररोज सरासरी ३५० जंबो सिलिंडर ऑक्सिजन रुग्णांना द्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. यावरून परिस्थितीचे गांभीर्य दिसून येते.
मनुष्यबळ अपुरेएका रुग्णाचे व्हेंटिलेटर दुसºया रुग्णाला लावण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ कमी पडू लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एका शिफ्टमध्ये केवळ एकच कर्मचारी असून, त्यालाच व्हेंटिलेटर किंवा आॅक्सिजन सिलिंडर बदलावे लागते. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने आरोग्य यंत्रणेची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे.