ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. गत काही दिवसांपूर्वी राजूरा सरोदे येथे कोविड चाचणी घेण्यात आली होती; मात्र या शिबिराला नागरिकांनी पाठ दाखविल्याची माहिती डॉ. शेगोकार यांनी दिली. त्यामुळे दि. ८ मे रोजी गावात शिबिर ठेवण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. शेगोकार यांनी केले आहे. गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरपंच वनमाला आखरे, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते, आशासेविका व इतर जनजागृती करीत आहे. नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करून मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
---------------
आकोली जहागीर येथे रक्तदान शिबिर
जामठी बु. : येथून जवळच असलेल्या आकोली जहांगीर येथील गौरव फुलमाळी मित्र परिवारतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन तंटामुक्ती अध्यक्ष नंदलाल ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष नंदलाल ठाकूर, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष तेजस टापरे, कार्याध्यक्ष उज्ज्वल ठाकरे, सागर नवले, माजी सरपंच भीमराव शेंडे, वंचित बहुजनचे सुरेश फुलमाळी, यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ५१ जणांनी रक्तदान केले.