अकोला : कोरोना विषाणूचा कहर सुरू असताना प्रतिबंधक लस आशेचा किरण म्हणून समोर आली आहे. देशपातळीवर १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले व इतर गंभीर आजार असलेल्यांना कोरोना लस देण्यास प्रारंभ झाला असून, शासकीय व खासगी केंद्रांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणाबाबत ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून, जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये पैसे मोजून लस घेण्यातही ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर असल्याचे ९ मार्चपर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात आरोग्य व फ्रंटलाइन कर्मचारी यांचे लसीकरण झाल्यानंतर, १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्यांसाठी १५ शासकीय व आठ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणास प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी काेविशिल्ड लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात ९ मार्चपर्यंत एकूण २९ हजार १०७ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यामध्ये २३ हजार ४७८ जणांनी शासकीय रुग्णालयांमधून लस घेतली, तर पाच हजार २३ जणांनी खासगी रुग्णालयांमध्ये शुल्क मोजून लस घेतली. खासगी रुग्णालयांत लस घेणाऱ्यांमध्ये ४३०२ ज्येष्ठ नागरिक असून, उर्वरित १३२१ जण इतर श्रेणींतील आहेत. कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याबाबत जनजागृती केली जात असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा ओढा लस घेण्याकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे.
सहव्याधीग्रस्तांपेक्षा ज्येष्ठांचा उत्साह अधिक
१ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले व इतर गंभीर आजार असलेल्यांसाठी लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. लसीकरणाबाबत ज्येष्ठांमध्ये पहिल्या दिवसापासूनच उत्साह दिसून येत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये पेसे देऊनही लस घेण्यात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर आहेत. ८ मार्चपर्यंत खासगीमध्ये लस घेतलेल्या एकूण ५६२३ लाभार्थ्यांमध्ये ४३०२ ज्येष्ठ नागरिक आहेत.
मी पहिल्याच दिवशी कोविशिल्ड लस घेतली. लस घेल्यानंतर मला कोणताही त्रास झाला नाही. किंचित, हातपाय दुखल्यासारखे वाटले, पण दुसऱ्या दिवशी कोणताही त्रास वाटला नाही. ६० पेक्षा अधिक वय असणाऱ्यांनी कोरोना लस घेतलीच पाहिजे.
- दीपशिखा शेगोकार, अकोला
कोरोना लसीबाबत अनेक संभ्रम होते. लस घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी शंकानिरसन केल्यानंतर खासगी रुग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला. लस घेतल्यानंतर मला कोणताही त्रास झाला नाही. सर्वांनी ही लस घेतली पाहिजे.
- निरंजन गवई, अकोला