लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान घातले असून, पहिल्यांदाच कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५५५ वर पोहोचली आहे. रुग्णवाढीचा बहुतांश भार सर्वोपचार रुग्णालयावर पडत असला, तरी आरोग्य विभागामार्फत ८२५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. म्हणजेच जीएमसीसह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांसाठी १,२५५ खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असून, कोरोनाबाधितांचा आतापर्यंतचा आकडा ३,०९७ वर पोहोचला आहे. यामध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५५५ असून, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पहिल्यांदाच एवढी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यावर पुन्हा कोरोनाचे संकट वाढत आहे. त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून, तालुकास्तरावर कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केल्या जात आहे; मात्र ग्रामीण भागातील बहुतांश गंभीर रुग्णांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले जात आहे. या शिवाय, शेजारील जिल्ह्यातील रुग्णांचाही भार सर्वोपचार रुग्णालयावर पडत आहे. त्यामुळे खाटांची समस्या उद््भवत आहे. असे असले, तरी आरोग्य विभागामार्फत मूर्तिजापूर, अकोट, बाळापूर आणि या ठिकाणी लक्षणे नसणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
तरी जीएमसीवर रुग्णसंख्या वाढीचा भार!सर्वोपचार रुग्णालय वगळता रुग्णांसाठी इतरत्रही खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र या ठिकाणी गंभीर रुग्णांसाठी आवश्यक उपाययोजना नसल्याने बहुतांश रुग्णांची धाव सर्वोपचार रुग्णालयाकडे आहे. या शिवाय आवश्यक सुविधा आणि डॉक्टरांची उपलब्धता असल्याने बुलडाणा, वाशिमसह जवळपासच्या जिल्ह्यातील गंभीर रुग्णदेखील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याचे वास्तव आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढ आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान आहे. त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग तयारीला लागला असून, जीएमसी वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास आणखी खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला