अकोला: शहरात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील संशयित रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यासाठी महापालिकेने भरतीया रुग्णालयात उपलब्ध करून दिलेली सुविधा बंद करीत जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने ही सुविधा गुरुवारपासून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात सुरू करणार असल्याचा दावा केला होता. या ठिकाणी नमुने देण्यासाठी गेलेल्या अकोट फैल परिसरातील तब्बल २८ संशयित रुग्णांना नमुने घेण्याची प्रक्रिया बंद असल्यामुळे घरी परत यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील निकटवर्तीय संशयित रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधांमुळे त्या ठिकाणी जाण्यास नकार दिला होता. संशयित रुग्णांची तपासणी न झाल्यास पावसाळ्यात मोठा उद्रेक होईल, या विचारातून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपाच्या भरतीया रुग्णालयात संशयित रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यास प्रारंभ केला. नमुने घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील चार वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते. संशयित रुग्णांनी नमुने देण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे कोरोनाचे तातडीने निदान होणे शक्य झाले. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालल्यामुळे जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.यादरम्यान, संशयित रुग्णांचे नमुने घेतल्यानंतर त्यांना अहवाल येईपर्यंत घरी न ठेवता पीडीकेव्ही परिसरात ‘क्वारंटीन’ करण्याच्या प्रस्तावावर उशिरा का होईना, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी एकमताने निर्णय घेतला. त्यानुषंगाने मनपाच्या भरतीया रुग्णालयातील नमुने घेण्याचे केंद्र बंद करीत ते पीडीकेव्ही परिसरात हलविण्यात आले. या ठिकाणी गुरुवारपासून संशयित रुग्णांचे नमुने घेणार असल्याचा दावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केला होता. या दाव्याची पहिल्याच दिवशी पोलखोल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.संशयित रुग्णांना ठेवले ताटकळतगुरुवारी अकोट फैल, तारफैल परिसरातील २८ संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी मनपाच्यावतीने रुग्णांना सिटी बसमध्ये घेऊन पीडीकेव्ही परिसरात नेण्यात आले. या ठिकाणी नमुने घेण्याची प्रक्रिया तूर्तास बंद असल्याचे सांगत रुग्णांना अनेक तास ताटकळत ठेवण्यात आले. अखेर कंटाळलेले रुग्ण दुपारी घरी परत आले.आक्षेप घेतल्यानंतर ‘क्वारंटीन’!रुग्ण नमुने न देताच घरी परत आल्याची बाब समोर आल्यानंतर अकोट फैलमधील काँग्रेसचे नगरसेवक पराग कांबळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामकाजावर आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. पराग कांबळे यांनी आक्षेप घेतल्यानंतर सायंकाळी ४ वाजता संबंधित रुग्णांना पीडीकेव्हीमध्ये नमुने घेईपर्यंत ‘क्वारंटीन’ करण्यात आले.पीडीकेव्हीमध्ये नमुने घेण्यासाठी रुग्णांना पाठविण्यात आले होते. या ठिकाणी नमुने घेण्याची प्रक्रिया बंद असल्याने काही रुग्ण घरी परत आले. त्यांना सायंकाळी पीडीकेव्हीच्या परिसरात ‘क्वारंटीन’ करण्यात आले आहे.- संजय कापडणीस,आयुक्त, मनपा.