अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. सोमवार, २९ जून रोजी आणखी २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५३६ झाली आहे. दरम्यान, २८ जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान सद्या ३६६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी ३५७ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ३३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त २२ पॉझिटीव्ह अहवालात १० महिला व १२ पुरुष आहेत. यामध्ये चार जण गजानन नगर अकोला, चार जण कळंबेश्वर येथील, तीन जण गाडगेनगर, दोन जण हरिहर पेठ, दोन जण सिंधी कॅम्प, तर दगडी पुल, अकोट फैल, अयोध्यानगर, डाबकीरोड, आदर्श कॉलनी, कामा प्लॉट व विठ्ठल मंदिर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी प्राप्त अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन पुरुष व दोन स्त्री रुग्णांचा समावेश आहे. ते हरिहरपेठ, दगडीपुल, तारफैल व अकोट येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.२८ जणांना डिस्चार्जदरम्यान आज दिवसभरात २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात आठ जण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी सोडण्यात आले. त्यात दोघे सिंधी कॅम्प, दोघे अकोट फैल येथील तर उर्वरित हरिहरपेठ, गुलजारपुरा, जुने शहर व तारफैल येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.तर दहा जणांना कोविड केअर सेंटर मधून घरी सोडण्यात आले. त्यात तिघे सिंधी कॅम्प, दोघे शंकर नगर, दोघे अकोट फैल, बैदपुरा, लाडिज फैल, गायत्री नगर येथील रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे.३६६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण १५३६ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७७ जण (एक आत्महत्या व ७६ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १०९३ आहे. तर सद्यस्थितीत ३६६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.