अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, शुक्रवार, १८ डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २९, तर रॅपिड ॲन्टिजन चाचण्यांमध्ये तीन असे एकूण ३१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १००८२ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५६८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये तेल्हारा येथील सहा, जुने राधाकिशन प्लॉट येथील तीन, खरप रोड व सोपीनाथ नगर येथील प्रत्येकी दोन, तरपारस, सिद्ध कॅम्प, आदर्श कॉलनी, मलकापूर, मोठी उमरी, लहरिया नगर, गोरक्षण रोड, व्हीएचबी कॉलनी, उरळ ता. बाळापूर व रामदास पेठ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी कौलखेड येथील दोन, तर डाबकी रोड, स्वस्तिक सोसायटी, केशव नगर व न्यू तापडिया नगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
रॅपिड चाचण्यांमध्ये तीन ‘पॉझिटिव्ह’
शुक्रवारी दिवसभरात झालेल्या ९३ चाचण्यांमध्ये केवळ तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत झालेल्या एकूण २७४३३ चाचण्यांमध्ये १८८० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
१४ जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून पाच, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन अशा एकूण १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
७४० अॅक्टिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १००८२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९०३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७४० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.