अकाेला: दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्या वाढीचे सत्र सुरूच असून, मंगळवारी त्यात आणखी ३४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामध्ये २७ अहवाल आरटीपीसीआर चाचणीचे, तर ७ अहवाल रॅपिड ॲन्टीजन चाचणीचे आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी ११९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गत दोन आठवड्यापासून ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे; परंतु मंगळवारी ११९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण झाली. मंगळवारी ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात आरटीपीसीआरचे २७ अहवाल आहेत. यामध्ये लाखपुरी ता. मूर्तिजापूर येथील तीन, मलकापूर व माधवनगर येथील प्रत्येकी दोन तर गोरक्षण रोड, शास्त्री नगर, जेतवन नगर, गायत्रीनगर, सांगवी खु, शिवाजी नगर, खोलेश्वर, पातूतुर, खडकी, दुर्गा चौक, राऊतवाडी, बालाजी प्लॉट, शेलाड ता. बाळापूर, गणेशनगर, मुखर्जी बंगला, आकाशवाणी मागे, आळशी प्लॉट, जठारपेठ व तुकाराम चौक येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत. सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ५६५ पर आला असून, ८६०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत २९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा धोका कायम असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
सुरक्षीत अंतर अन् मास्कचा वापर आवश्यक
कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, अशा परिस्थितीत नागरिकांनी बेफिकीर न होता इतरांपासून सुरक्षीत अंतर ठेवणे तसेच मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. वारंवार हात धुण्याचेही आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
लक्षणे दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला
कोरोनासोबतच इतर आजारही डोके वर काढत आहेत. अशा परिस्थितीत अनेक जण कोरोनाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे कोरोनाच फैलावही होत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रुग्णांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.