अकोला : कोरोनाबाधितांचा वाढता आकडा थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, रविवार, १७ मे रोजी दिवसभरात ३७ जणांचे कोरोना संसर्ग चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २५७ वर पोहचली आहे. दरम्यान, बुधवार, १३ मे रोजी मयत झालेल्या मुर्तीजापूर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील मृतकांचा आकडाही १७ वर गेला आहे. रविवारी १७ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत १२२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. शनिवारी केवळ दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोलेकरांना किंचित दिलासा मिळाला होता. रविवारी दिवसभरात १७६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी सकाळी ३२ तर सायंकाळी ५ असे एकूण ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये १२ महिला व २५ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी तारफैल भागातील ४, माळीपूरा- ४, खैर मोहम्मद प्लॉट- ४ आंबेडकर नगर- ३, ताजनापेठ- ३,अकोट फैल-३, तर मुर्तिजापूर,अगरवेस,बिर्ला गेट, जठारपेठ, खरप, काळा मारोती, जुना आळशी प्लॉट, वर्धमान डुप्लेक्स राजपुतपुरा,रामदासपेठ पोलीस क्वाँर्टर, नायगाव, खोलेश्वर, शास्त्रीनगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामधील एक महिला जिल्हा स्त्री रुग्णालातून संदर्भित झालेली आहे. तर सायंकाळी फिरदौस कालीनीतील तीघांचा व अकोट फैल आणि डाबकी रोड भागातील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.मुर्तीजापूर येथील ४८ वर्षीय व्यक्तीला बुधवार, १३ मे रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या व्यक्तीचा त्याच दिवशी मृत्यू झाला. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित मृतकांची संख्याही १७ झाली आहे. १७ जणांचा कोविड-१९ आजाराने मृत्यू, तर एका कोरोनाबाधिताची आत्महत्या अशा एकूण १८ मृत्यूची नोंद आहे. दरम्यान, आतापर्यंत ११७ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.