अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मुर्तीजापूर येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची नोंद रविवार, १९ जुलै रोजी झाली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०३ झाला आहे. तर रविवारी ३८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या २१२५ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी सकाळी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे २६७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २२९ जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये १६ महिला व २२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये अकोट येथील ३३ जण, मुर्तीजापूर येथील ३ जण, तर उर्वरित अकोला शहरातील जुना तारफैल व रामनगर भागातील रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यूकोरोनावर उपचार घेत असलेल्या मुर्तीजापूर येथील ६० वर्षीय पुरुषाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. सदर रुग्णास १६ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०३ झाली आहे.३४० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१२५ असून, यापैकी १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १६८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३४० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.