अकोला : जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने असताना रविवारी शहरात आणखी एक ा ४१ वर्षीय व्यक्तीचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. कोरोना बाधित हा सिंधी कॅम्प परिसरातील रहिवासी असून, पोलिसांनी सकाळीच हा परिसर सील केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सलग सहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. परंतु, रविवारी सकाळी प्राप्त अहवालामध्ये सिंधी कॅम्प येथील एका ४१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी रविवारी सकाळीच हा परिसर सील करण्यास सुरुवात केली. रविवारी सकाळी एकूण १२ अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी ११ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १७ वर पोहोचली असून, यातील एकाचा मृत्यू, तर एकाने आत्महत्या केली आहे. पातूर येथील सात जणांना कोरोनामुक्त करण्यात आले आहे. उर्वरीत आठ अॅक्टीव्ह रुग्ण हे अकोला शहरातील आहेत.
पहिल्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्हबैदपुरा येथील कोरोनाबाधित जिल्ह्यातील पहिल्या रुग्णाचा पाचवा आणि सहावा वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, याच रुग्णाच्या नातेवाईकांच्या फेरतपासणी अहवालाची प्रतीक्षा असून, त्यामध्ये ३ वर्षीय बालकाचाही समावेश आहे.