लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एका पाठोपाठ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने अकोल्यात कोरोनाचा उद्रेक होतो की काय, अशी परिस्थिती असताना गत दोन दिवसांत या विषाणूची बाधा झालेला नवा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही, तर दुसरीकडे मंगळवारी पातूर येथील सहा जणांसह आणखी २० जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी सहा नवे संदिग्ध रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले असून, आज अखेरपर्यंत १२ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याने धोका मात्र टळलेला नाही. आज अखेर एकूण ४५५ अहवालांपैकी ४४३ अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी ४२७ निगेटिव्ह आहेत, हे विशेष.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी वीस अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी सर्व निगेटिव्ह असून, त्यात पातूर येथील सहा जणांच्या तिसऱ्या फेरतपासणीच्या अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत एकूण ४५५ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३५९, फेरतपासणीचे ६९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २७ नमुने होते. आज वीस अहवाल प्राप्त झाले, ते सर्व निगेटिव्ह आले आहे. त्यात सहा हे पातूर येथील रुग्णांचे फेर तपासणीचे आहेत. ही त्यांची तिसरी फेरतपासणी होती.
अद्यापही ते कोरोनामुक्त घोषित नाहीतपातूर येथील सहा कोरोना बाधित रुग्णांचा दुसरा फेरतपासणी अहवालही निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला; परंतु या सहाही रुग्णांना अद्याप कोरोनामुक्त घोषित करण्यात आले नाही. चीनमधील कोरोनामुक्त रुग्ण पुन्हा कोरोना बाधित झाल्याचे समोर आल्यामुळे भारतात ही खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे या रुग्णांना आणखी काही दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.
३३ जण रुग्णालयात भरती!जिल्ह्यात सद्यस्थितीत ३३ रुग्ण भरती आहेत. आज अखेर बाहेरुन आलेल्यांची संख्या ४८७ आहे. त्यापैकी १८२ जण गृह अलगीकरणात तर ११७ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण २९९ जण अलगीकरणात आहेत. १५५ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे. तर विलगीकरणात आता ३३ जण दाखल आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या १६जिल्ह्यात आज अखेर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ आहे. त्यातील एकाचा मृत्यू, तर बाळापुरातील आसामच्या रुग्णाने आत्महत्या केली आहे.उर्वरित ११ जणांचे अहवाल फेरतपासणीत निगेटिव्ह आले. फेरतपासणीतही पॉझिटिव्ह आलेला तीन वर्षीय बालक व मयत रुग्णाचे मुलगा व मुलगी हे दोघे भावंडं असे तिघे जण पॉझिटिव्ह आहेत.