अकोला : झपाट्याने प्रसार होत असलेल्या कोरोनाचे अकोला शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असून, सोमवार, २५ मे रोजी कोरोनाची बाधा झालेल्यांची एकूण संख्या चारशेचा टप्पा ओलांडत ४०६ वर जाऊन पोहचली आहे. सोमवारी सकाळी आणखी नऊ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, रविवारी रात्री २२ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, सद्यस्थितीत १३१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आलेल्या अकोल्यात मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासून कोरोनाच्या संक्रमनाने वेग घेतला असून, बाधीत होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस दुहेरी आकड्याने वाढत आहे. रविवार, २४ मे रोजी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३९७ वर पोहचली होती. यामध्ये सोमवारी आणखी नवीन ९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. रविवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून एकूण १८३ संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी १७४ अहवाल निगेटिव्ह असून, उर्वरित नऊ अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये चार पुरुष व पाच महिला रुग्णांचा समावेश आहे.या रुग्णांपैकी तीन जण हे फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत. तर अन्य महसूल कॉलनी, अण्णाभाऊ साठे नगर अकोट फैल, देशमुख फैल, अकोट फैल, मोहता मिल नानकनगर, गोकुळ कॉलनी येथील रहिवासी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत शहरातील ७५ भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असून, सर्वच तालुक्यांमध्येही रुग्ण आढळून येत आहेत. कोरानाबाधितांच्या मृत्यूचा आकडाही २४ वर पोहचला आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत २५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आता १३१ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत.रविवारी २२ जणांना ‘डिस्चार्ज’एकीकडे कोरोनाच्या कचाट्यात सापडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्याही वाढत आहे. रविवारी रात्री एकूण २२ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यापैकी तीघांना घरी पाठविण्यात आले. तर उर्वरित १९ जणांना संस्थागत अलगिकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.प्राप्त अहवाल-१८३पॉझिटीव्ह-नऊनिगेटीव्ह-१७४आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ४०६मयत-२४(२३+१),डिस्चार्ज- २५१दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १३१