अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, रुग्णवाढीचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी आणखी १०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, दोघांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह अहवालामध्ये ९० अहवाल आरटीपीसीआर, तर १८ अहवाल रॅपिड अॅन्टिजन टेस्टचे आहेत. त्यामुळे आतापर्यंत बाधितांचा आकडा ६,९४२ वर पोहोचला, तर मृत्यूचा आकडा २१७ वर पोहोचला आहे.गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यावर नियंत्रणासाठी प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्या तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचे सत्र थांबता थांबेना. गुरुवारी त्यात आणखी दोघांची भर पडली. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मोरगाव उरळ येथील ५० वर्षीय महिलेसह अकोट येथून ७९ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. हे दोन्ही रुग्ण २० सप्टेंबर रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले होते. तर दुसरीकडे १०८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालामध्ये सिव्हिल लाइन, खदान व मोरगाव भाकरे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच सायंकाळी प्राप्त अहवालामध्ये ३३ महिला व ५४ पुरुष आहे. त्यातील मूर्तिजापूर येथील ११ जण, कुटासा व जीएमसी येथील प्रत्येकी नऊ जण, लेडी हार्डिंगजवळ येथील चार जण, कौलखेड, खदान, जठारपेठ, अकोट व लहान उमरी येथील प्रत्येकी तीन जण, अकोट फैल, मंडुरा, शात्री नगर, वानखडे नगर, गोरक्षण रोड, मोठी उमरी, रेणुका नगर, सिंधी कॅम्प व सिरसो येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित बार्शीटाकळी, महसूल कॉलनी, बायपास, लक्ष्मी नगर, चांदूर, डाबकी रोड, देवरावबाबा चाळ, बाळापूर, कान्हेरी गवळी, बोरगाव मंजू, कच्ची खोली, शिवणी, खिरपूर, हिंगणा रोड, अंबिका नगर, खडकी, बळीराम चौक, किनखेड, मोरगाव भाकरे, खोलेश्वर व दहीहांडा येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. सद्यस्थितीत १,५६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
१९९ जणांना डिस्चार्जगुरुवारी एकूण १९९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ४० जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून नऊ जण डिस्चार्ज देण्यात आला. उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथील आठ जण, हॉटेल व खासगी रुग्णालयातून १५, आयुर्वेदिक महाविद्यालय येथून दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आले. तसेच होम क्वारंटीनचा कालावधी पूर्ण करणारे १२५, अशा एकूण १९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.