अकोला: दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांच्या तुलनेत जिल्ह्याचा कोविड पॉझिटिव्ही रेट १२ टक्क्यांवर आहे. त्या अनुषंगाने कोविड रुग्णालये आणि खाटांचे नियोजन करण्याबाबत शासनाने निर्देश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभाग सतर्क असून, पर्याप्त खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा धोका पाहता प्रयोगशाळा नमुन्यांमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे शेकडा प्रमाण किती, याप्रमाणे रुग्णोपचार व्यवस्था करण्यासंदर्भात शासनातर्फे आरोग्य विभागाला सतर्क केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण चाचण्यांच्या तुलनेत १२ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानुसार एकूण कोविड रुग्णालयांच्या २० टक्के कोविड रुग्णालयांची संख्या वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ११ शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये कोविडसाठी ७६९ खाटा आरक्षित केले आहेत; मात्र सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णालयांची संख्या पाहता अतिरिक्त रुग्णालय वाढविण्याची गरज नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सागण्यात येत आहे.
गरजेनुसार सुरू होणार बंद कोविड सेंटर
सध्या पॉझिटिव्ह असलेल्या बहुतांश कोविड रुग्णांमध्ये लक्षणे नसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अशा रुग्णांना होमक्वारंटिन करण्यात आले आहे, तर लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्ण वाढल्यास आवश्यकतेनुसार बंद पडलेले कोविड सेंटर सुरू केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.