अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढतच असून, दररोज शंभराच्यावर रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. सद्यस्थितीत कोरोना रुग्णसंख्या डबलिंग रेट ६७ दिवसांवर आला आहे. राज्यात हे प्रमाण ५३.२ व देशात ५२.४ दिवसांवर आहे. यापूर्वी जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग ३२ दिवस होता.जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, परिस्थिती गंभीर होत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ७ एप्रिल रोजी आढळला होता. त्यानंतर ३१ दिवसांत रुग्णसंख्या शंभरीने वाढली असून, १३७ वर पोहोचली होती. १९ मेपर्यंत ३१ दिवसांचा हा डबलिंग रेट केवळ ११ दिवसांवर पोहोचला होता, तर २९ मे रोजी दहा दिवसांवर आला होता. मे महिन्यात कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले होते. जून महिन्यातही कोरोनाचा कहर कायमच होता; परंतु वाढत्या रुग्णसंख्येसोबतच डबलिंग रेटही वाढू लागला. जून महिन्यात रुग्णसंख्या दुपटीचा वेग २१ दिवसांवर गेला होता. जशजशी रुग्णसंख्या वाढत गेली, तसा रुग्णसंख्या वाढीचा दरही वाढत गेला. जुलै महिन्यात हा दर ३२ दिवसांवर, तर सप्टेंबर महिन्यात रुग्णवाढीचा दर ५०.४ दिवसांवर पोहोचला आहे; मात्र गत दहा दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक होत आहे.डबलिंग रेट कशासाठी?शासन, प्रशासन, यंत्रणा डबलिंग रेटविषयी नेहमी जागृत असतात. देश, राज्य, विभाग आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ किंवा घट कशाप्रकारे होत आहे, याविषयी सतत आकडेमोड सुरू असते. कोरोना संसर्गाने किती दिवसांत दुप्पट रुग्ण होत आहेत, या अंदाजावरून येत्या काही दिवसात किती रुग्णसंख्या होऊ शकेल, याविषयीचा अंदाज घेतला जातो. त्यानुसार, हॉस्पिटल, खाटांची संख्या, आॅक्सिजन, व्हेंटिलेटर, औषध या सर्व बाबींचे नियोजन केले जाते.जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दुपटीचा वेग ५०.४ वर पोहोचला आहे. नागरिकांनी बेफिकीर होऊन चालणार नाही. नियमित मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तरच कोरोनाची साखळी तोडण्यात यश येईल.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला
CoronaVirus in Akola : डबलिंग रेट ५०.४ दिवसांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 9:10 AM