अकोला : अकोला जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णासह आठ पॉझिटिव्ह रुग्णांच्या दुबार तपासणीचा अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आल्याने अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. निगेटिव्ह आलेल्या या रुग्णांमध्ये अकोला शहरातील बैदपुरा व अकोट फैल भागातील दोघे, तर पातूर येथील सहा जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.अकोला जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण म्हणून बैदपुरा भागातील एकाची नोंद झाली होती. त्यानंतर अकोट फैल भागात एक, तर पातूर तालुक्यातील सात जण आढळून आले होते. तेव्हापासून हे सर्व रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत. उपचारानंतर या सर्व रुग्णांची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात येऊन थ्रोट स्वॅब घेण्यात आले. या चाचणीचा अहवाल गुरुवारी सकाळी प्राप्त झाला. त्यामध्ये आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. निगेटिव्ह आलेल्या या रुग्णांची २४ तासानंतर पुन्हा चाचणी घेण्यात येणार असून, त्यामध्ये ते निगेटिव्ह आढळून आले, तर त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी सांगितले.
गुरुवार दि.१६ एप्रिल २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार
आज नव्याने दाखल रुग्ण संख्या- ४५आज प्राप्त अहवाल- ३३आजपर्यंत प्राप्त तपासणी अहवाल-२८५ पैकी २३८ निगेटीव्ह पॉझिटीव्ह १४ (पैकी दोघे मयत झाल्याने आता शिल्लक १२ रुग्ण)अप्राप्त अहवाल- २४