अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मंदावला असला, तरी रुग्ण आढळण्याचे सत्र सुरुच आहे. शनिवार ७ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,५३६ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १६७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये गोरक्षण रोड येथील तीन, कौलखेड व आळसी प्लॉट येथील प्रत्येकी दोन,जीएमसी, शिवाजी पार्क, जठारपेठ, न्यू तापडिया नगर, रणपिसे नगर, सिंधी नगर, शास्त्री नगर, निंबा ता. मुर्तिजापूर, पाथर्डी ता. तेल्हारा व मोठी उमरी येथील प्रत्येकी एक असे एकूण १८ रुग्णांचा समावेश आहे.२१६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,५३६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८०३८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २१६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.