लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सप्टेंबर महिना अकोलेकरांसाठी घातक ठरला होता; पण गत आठवडाभरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख कमालीचा घसरला आहे, तर दुसरीकडे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही घटली आहे. त्यामुळे अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी बेफिकिरी घातक ठरू शकते.सप्टेंबर महिन्यात दिवसाला सरासरी ३०० पेक्षा जास्त नमुन्यांची तपासणी करण्यात येत होती. त्यामध्ये दिवसाला शंभरपेक्षा जास्त व्यक्तींचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह निघत होते. त्यामुळे महिनाभरात ३ हजारापेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.मागील सहा महिन्यात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह अहवालांची नोंद करण्यात आली; मात्र महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांमधून पॉझिटिव्ह अहवालांमध्ये कमालीची घट होण्यास सुरुवात झाली.पॉझिटिव्ह अहवालाची संख्या शंभरवरून घसरून ५० च्या खाली आली. शिवाय, रॅपिड अॅन्टिजन चाचण्यांमध्येही पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटल्याने अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला. असे असले तरी थोडीही बेफिकरी घातक ठरू शकते.आठ दिवसात १,१३७ रुग्ण बरे!जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी ६ हजार ५६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यापैकी १ हजार १३७ रुग्णांना मागील आठ दिवसात सुटी देण्यात आली. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही ८३२ वर पोहोचली आहे.
CoronaVirus in Akola: आठवडाभरात घसरला रुग्णवाढीचा ग्राफ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 10:23 IST