अकोला: कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारपासून शहरात संपूर्ण अकोलेकरांची ‘स्क्रीनिंग’ करून आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले होते. दरम्यान, आरोग्य तपासणीसाठी मनपा प्रशासनाने सुमारे एक हजार कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता, ती पूर्ण होऊ शकली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्हा प्रशासनाचे दावे हवेत विरल्याचे समोर आले.जिल्ह्यासह शहरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. गत काही दिवसांत शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली असून, जिल्हा प्रशासन तसेच महापालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय व पोलीस यंत्रणा या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले आहे. आज रोजी विदर्भातून सर्वाधिक रुग्णसंख्या अकोला शहरात आढळून आल्याने राज्य शासनाकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. उशिरा का होईना, कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी गुरुवारपासून संपूर्ण अकोलेकरांच्या आरोग्य तपासणी मोहिमेला प्रारंभ करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मनपा प्रशासनाला दिले होते. प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाने ही मोहीम सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे किमान एक हजार कर्मचाऱ्यांची तसेच रुग्णांची तपासणी करण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यासंदर्भात २६ मे रोजी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. गुरुवारी दुपारपर्यंतही मनपा प्रशासनाला मनुष्यबळ पुरविण्यात आले नसल्याचे समोर आले. मनुष्यबळ नसल्यामुळे अकोलेकरांच्या आरोग्य तपासणीला प्रारंभ होऊ शकला नाही.
प्रशासकीय यंत्रणा नियोजनात अपयशीअकोलेकरांच्या आरोग्य तपासणीसाठी गठित केलेल्या समितीच्या अध्यक्ष पदाची धुरा मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे सोपविण्यात आली असली तरीही त्यांनी मागणी केलेले कर्मचारी जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देऊ शकले नाही. कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश दिला नसतानाही मोहिमेचा गाजावाजा करण्याची घाई नेमकी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुख्यमंत्र्यांना केले अवगतजिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची होणारी गैरसोय, वॉर्डातील अस्वच्छता, रुग्णांना ताटकळत ठेवणे आणि या सर्व प्रक्रियेमध्ये जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सपशेल कुचकामी ठरल्याप्रकरणी शिवसेनेच्यावतीने गुरुवारी मुख्यमंत्र्यांना अवगत करून देण्यात आले.