अकोला : सप्टेंबर महिन्यात परमोच्च बिंदू गाठलेल्या कोरोना संसर्गाची लाट आता ओसरू लागली असून, आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोविड रुग्णालयांमध्ये असलेल्या एकूण खाटांपैकी मंगळवार, १३ आॅक्टोबर रोजी कोविड रुग्णालयांमधील एकूण ७६९ पैकी ५४३ खाटा रिक्त आहेत. सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आता होम क्वारंटीनलाच पसंती देत असल्याने या रुग्णांसाठी असलेल्या कोविड केअर सेंटरमध्येही बहुतांश खाटा रिक्तच असल्याचे दिलासादायक चित्र आहे.एप्रिल महिन्यात पहिला रुग्ण आढळलेल्या अकोला जिल्हा व शहरात अनलॉन १ नंतर कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत गेला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाने परमोच्च बिंदू गाठला. दररोज तिहेरी आकड्याने रुग्णांची संख्या वाढली. याच महिन्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले. दररोज मोठ्या संख्येने गंभीर रुग्ण आढळून येत होते. जिल्ह्यातील कोविड रुग्णालयातील आॅक्सिजन खाटांची संख्या अपुरी पडत होती. रुग्णांना वेटिंगवर राहावे लागत होते. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. आता आॅक्टोबर महिन्यात चित्र पालटले असून, कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला आहे. दररोज सरासरी १० ते १५ रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात मंगळवार, १३ आॅक्टोबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ३७९ असून, यापैकी काही रुग्ण कोविड हॉस्पिटलमध्ये तर काही रुग्ण होम क्वारंटीनमध्ये आहेत.
अशी आहे खाटांची स्थितीजिल्ह्यात सात कोविड समर्पित आरोग्य केंद्र (डीसीएचसी), तर पाच कोविड समर्पित रुग्णालय (डीसीएच) आहेत. यामध्ये आॅक्सिजन खाटांची एकूण संख्या ७६९ एवढी आहे. मंगळवार, १३ आॅक्टोबर रोजी यापैकी तब्बल ५४३ खाटा रिक्त आहेत. सौम्य लक्षणांच्या रुग्णांसाठी असलेल्या कोविड केअर सेंटरमध्येही बहुतांश खाटा रिकाम्याच आहेत.