अकोला : कोरोनाच्या संशयावरून आतापर्यंत दाखल २७ जणांचा वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे, तर आयसीयूमध्ये दाखल एकाच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. असे असले तरी ‘होम क्वारंटीन’मध्ये असणाऱ्या नागरिकांनी जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे.गत दोन दिवसांत आयसोलेशन कक्षात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण दाखल झाला नाही. अकोलेकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे; मात्र अतिदक्षता कक्षात शुक्रवारी रात्री एक रुग्ण दाखल असून, त्याचे नमुने कोरोना चाचणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहेत. अद्याप त्याचे अहवाल प्राप्त झाले नाहीत. असे असले तरी ‘होम क्वारंटीन’मध्ये असलेल्या ४८ नागरिक ांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. या नागरिकांनी ‘होम क्वारंटीन’चा कार्यकाळ नियमांचे पालन करून पूर्ण केल्यास अकोल्यावरील मोठे संकट टळणार आहे.‘त्या’ डॉक्टरचे अहवाल ‘निगेटिव्ह’!अकोल्यातील शासकीय सेवेत कार्यरत ३० वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर शुक्रवारी हिंगोली येथे आयसोलेशन कक्षात कोरोनाचा संशयित रुग्ण म्हणून दाखल झाले. शनिवारी त्या डॉक्टरचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आला. त्यामुळे अकोल्यातील शासकीय वैद्यकीय संस्थेने सुटकेचा श्वास घेतला.