अकोला : अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंंदिवस वाढतच असून, शनिवार, ३० मे रोजी यामध्ये आणखी १२.पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत हा आकडा ५७० वर गेला आहे. दरम्यान, शनिवारी पहाटे एका ७१ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांचा आकडाही ३० वर गेला आहे. शनिवारी आणखी ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ११७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शनिवारी दिली.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असले, तरी कोरोनासंसर्गाचा वेग कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. शुक्रवार, २९ मे रोजी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५५८ होता. यामध्ये शनिवारी नव्या १२ रुग्णांची भर पडत हा आकडा वर ५७० गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून शनिवारी दिवसभरात अहवाल १२३ प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर १११ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये आठ महिला व चारपुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण हे बाळापूर, आलेगाव पातूर, तसेच रामदासपेठ, शरीफ नगर, राधाकिसन प्लॉट, गायत्री नगर, फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण हे अकोट फैल, गायत्रीनगर, सिटी कोतवाली, मोहता मिल, सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी आहेत. दरम्यान, डाबकी रोड भागातील साई नगरातील एका व्यक्तीचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. सदर व्यक्तीला २४ मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
३५ जणांना डिस्चार्जआज दुपारनंतर ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील पाच जणांना घरी तर उर्वरित ३० जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.
११७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ५७० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३० जण (एक आत्महत्या व २९ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज ३५ जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ४२३ झाली आहे. तर सद्यस्थितीत ११७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे. तर आज एका रुग्णाला नागपूर येथे संदर्भित करण्यात आले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.