अकोला : कोरोना प्रादूर्भाव थांबविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असतानाही कोरोनाबाधितांची संख्या मात्र आटोक्यात येण्याची कोणतीही चिन्हे नसून, अकोल्यात रविवार, १० मे रोजी आणखी सहा नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १५३ झाली आहे. दरम्यान, रविवारी एका कोरोनाबाधित ५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही १३ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने रविवारी दिली. मयत महिला ही खैर मोहम्मद प्लॉट भागातील रहिवासी असून, तीला गुरुवार, ७ मे रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. रविवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश असून, ते मोहम्मद अली रोड, रामनगर सिव्हिल लाईन्स, तारफैल भवानी पेठ, दगडीपूल जुने शहर व गवळीपूरा येथील रहिवासी आहेत.रेड झोनमध्ये समावेश झालेल्या अकोला शहरात आठवडाभरापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गत दोन दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत ५८ जणांची भर पडली आहे. शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न होत असतानाही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. रविवार, १० मे रोजी एकूण १०२ अहवाल प्राप्त झाले असून, सहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ९६ अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी १३ जणांचा मृत्यू (१२ कोविड-१९ आजाराने नैसर्गिक मृत्यू व एक आत्महत्या) झाला आहे. तर १४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत १२६ पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.आज प्राप्त अहवाल-१०२पॉझिटीव्ह-सहानिगेटीव्ह- ९६आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-१५३मयत-१३(१२+१),डिस्चार्ज-१४दाखल रुग्ण(अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२६