लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहराच्या उत्तर झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २ मधील अकोट फैल व प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा, ताजनापेठ, फुलारी गल्ली आदी परिसराला महापालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केल्यावरही या भागात काही नागरिकांची वर्दळ कायम असल्याचे चित्र आहे.प्रतिबंधित क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तींना शहरामध्ये इतर भागात फिरण्याची मुभा नाही. असे असतानादेखील काही नागरिक विविध कामकाजाच्या निमित्ताने घराबाहेर पडत असल्याचे समोर येत आहे. या गंभीर प्रकाराकडे महापालिका तसेच पोलीस प्रशासनाने अधीक लक्ष देण्याची गरज आहे.संसर्गजन्य कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वैद्यकीय आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, महापालिका व पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. ७ एप्रिल रोजी बैदपुरा भागातील इसमाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ८ एप्रिल रोजी अकोट फैल परिसरात दुसरा रुग्ण आढळून आला. त्यानंतर बैदपुरा येथील कोरोना बाधित इसमाच्या कुटुंबातील आणखी तीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आला होता. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशानुसार प्रभाग २ मधील अकोट फैल, प्रभाग ११ मधील बैदपुरा, ताजनापेठ व फुलारी गल्लीला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या पुढील आदेशापर्यंत या भागातील संपूर्ण वाहतूक व दैनंदिन कामकाज पूर्णत: बंद करण्यात आले आहे. या क्षेत्रातील नागरिकांना त्या परिसराच्या बाहेर निघण्यास सक्त मनाई आहे. असे असताना गत काही दिवसांपासून पोलिसांची नाकाबंदी असतानासुद्धा या भागातील नागरिक विविध कामकाजाच्या निमित्ताने प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या बाहेर निघत असल्याचे दिसून आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेल्या परिसरातील नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर निघू नये. किरकोळ कारणासाठी घराबाहेर निघाल्यास त्यांना थेट पोलीस कोठडीत डांबण्याचे निर्देश आहेत.- संजय कापडणीस,आयुक्त, मनपा.