अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार, १३ जून रोजी आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ४६ वर पोहचला आहे. तर कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९८५ झाली आहे.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख प्राप्त झालेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी दिवसभरात १०१ कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत, तर उर्वरित ८९ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तीन महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी रजपुतपुरा, बलोदे लेआऊट हिंगणारोड, गायत्रीनगर कौलखेड, हरिहरपेठ व बाळापूर येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर सांयकाळी हरिहरपेठ, अकोट फैल, मोठी उमरी,चांदुर खडकी रोड, शंकर नगर, वाडेगाव व बाळापूर येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.दोन महिला दगावल्यादरम्यान, शनिवारी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. दोन्ही मयत महिला आहेत. त्यापैकी एक ५२ वर्षीय महिलेचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. ही महिला अकोट फैल येथील रहिवासी असून, १० जून रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. जुने शहरातील देशपांडे प्लॉट भागातील ८० वर्षीय महिलेचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. सदर महिलेस ८ जून रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या दोन मृत्यूमुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ४६ वर पोहचला आहे. यापैकी ४५ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजारामुळे झाला असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे.आणखी १९ जणांना डिस्चार्जशनिवारी सायंकाळी १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात १२ महिला व सात पुरुष आहेत. यापैकी सात जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित १२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये दोन खडकी, दोन रामदास पेठ, दोन ध्रुव अपार्टमेंट, दोन सिंधी कॅम्प येथील, तर उर्वरीत जयहिंद चौक, श्रीहरी नगर, सिटी कोतवाली, आलेगाव पातूर, गजानन नगर, जुने शहर, हरिहर पेठ, माळीपूरा, रणपिसेनगर, हैदरपुरा व खदान येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६२५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३१४ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
प्राप्त अहवाल-१०१पॉझिटीव्ह-१२निगेटीव्ह-८९
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-९८५मयत-४६(४५+१),डिस्चार्ज-६२५दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३१४