अकोला : अकोल्यात कोरोनाचा हैदोस सुरूच असून, या संसर्गजन्य आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची व नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवार, २४ जुलै रोजी दिवसभरात मूर्तिजापूर तालुक्यातील ब्रम्ही खु. व अकोट येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३३, तर रॅपिड अॅन्टिजन चाचण्यांमध्ये २० असे एकूण ५३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा १00 झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २,३५४ झाली आहे. दरम्यान, ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ११० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३३ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७७ अहवाल निगेटिव्ह आहेत.पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सात महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मध्यवर्ती कारागृहातील १५ जणांसह, रामदासपेठ येथील तीन, महान येथील तीन जण, मोठी उमरी, लोटनपूर व केशव नगर येथील प्रत्येकी दोन जण, अडगाव बु., कुटासा, जुने शहर, खदान, वाडेगाव व जेल क्वॉटर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
५० जणांना डिस्चार्जशुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून २९ जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जणांना तर हॉटेल रिजेन्सी येथून नऊ जणांना अशा एकूण ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ३४९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रॅपिड टेस्ट: ६०८ चाचण्या; २० पॉझिटिव्ह
रॅपिड अॅन्टिजन टेस्ट मोहिमेंतर्गत दिवसभरात झालेल्या ६०८ चाचण्यांमध्ये २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अकोला ग्रामीण भागात ९१ चाचण्या झाल्या. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. अकोट येथे १०८ चाचण्या झाल्या. त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाळापूर येथे १४३ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बार्शीटाकळी येथे सात जणांच्या चाचण्या झाल्या. त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पातूर येथे १०४ चाचण्या झाल्या. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तेल्हारा येथे ५५ चाचण्या झाल्या. त्यापैकी कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. मूर्तिजापूर येथे ३२ चाचण्या झाल्या. त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. अकोला मनपा हद्दीत ४४ चाचण्या झाल्या व सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अकोला जिल्ह्यातील १५ आरोग्य कर्मचाºयांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात एकही अहवाल पॉझिटिव्ह नाही. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नऊ जणांच्या चाचण्या झाल्या. त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण ६०८ चाचण्या होऊन त्यात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ४,८३० चाचण्या झाल्या असून, २४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.