अकोला : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, शनिवारी यामध्ये आणखी दोघांची भर पडली आहे. शनिवारी आणखी दोन महिलांचे कोरोना संसर्ग चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकून संख्या १३९ वर पोहचल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. शनिवारी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या दोन्ही महिला असून, एक महिला खैर मोहम्मद प्लॉट भागातील, तर दुसरी खंगनपूरा भागातील आहे. खंगनपूरा भागातील २६ वर्षीय महिला ही जिल्हा स्त्रि रुग्णालयातून संदर्भित करण्यात आली असून, तीची नुकतीच प्रसुती झाली आहे.रेड झोनमध्ये समावेश झालेल्या अकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या गत आठवड्याभरापासून झपाट्याने वाढत आहे. शुक्रवार, ८ मे रोजी सर्वाधिक ४२ रुग्णांची नोंद होऊन कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १३७ वर पोहचला होता. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असताना शनिवारी यामध्ये आणखी दोन रुग्णांची भर पडून हा आकडा १३७ झाला आहे. शनिवारी एकूण ५४ अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी दोन पॉझिटिव्ह, तर उर्वरित ५२ निगेटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.