लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनचा धुमाकूळ सुरूच असून, गुरुवारी कोरोनाबाधितांचा आकडा २,०२७ वर, तर मृतकांचा आकडा ९९ वर पोहोचला आहे. गुरुवारी एकाचा मृत्यू झाला, तर ७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये १६ व्हीआरडीएल लॅबमधील, तर ग्रामीण भागातील ४६ जणांचे आणि मनपा क्षेत्रातील ११ रॅपिड अॅन्टीजन टेस्टमधील पॉझिटिव्ह अहवालांचा समावेश आहे.व्हीआरडीएल लॅबसोबतच जिल्ह्यात मनपा तसेच तालुकास्तरावर रॅपिड अॅन्टीजन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार, व्हीआरडीएल लॅबमधील चाचण्यांमध्ये १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. तर रॅपिड अॅन्टीजन टेस्टमध्ये ग्रामीण भागात ४६ जणांचा, तर मनपा क्षेत्रात ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तिन्ही मिळून दिवसभरात ७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, एकाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला ८२ वर्षीय रुग्ण हा करोडी, चोहोट्टा बाजार (ता. अकोट) येथील रहिवासी होता. उपचारादरम्यान गुरुवारी त्याचा मृत्यू झाला असून, तो ११ जुलै रोजी दाखल झाला होता. तर व्हीआरडीएल लॅबच्या अहवालानुसार, पॉझिटिव्ह रुग्णांपैकी मूर्तिजापूर येथील सहा जण, अकोट येथील पाच, जेतवन नगर येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी प्राप्त अहवालामध्ये बोरगाव मंजू येथील चौघांचा समावेश आहे. बुधवारीदेखील मनपा क्षेत्रातील ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २,०२७ वर पोहोचली आहे. गुरुवारी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, २८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
CoronaVirus : आणखी एकाचा मृत्यू; ७३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:00 AM