प्रवीण खेतेअकोला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर राज्यात सहा नवीन ‘व्हीआरडीएल’ लॅब सुरू करण्याला आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली होती. त्यानुसार, लॅब उभारणीच्या कामाला वेगही आला; परंतु ‘लॉकडाऊन’मुळे लॅबसाठी आवश्यक उपकरणे आणि रसायने उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे अकोल्यासह राज्यातील नागपूर जीएमसी आणि मिरज येथील ‘व्हीआरडीएल’ लॅबची आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संशयित रुग्णांची वैद्यकीय तपासणी जलद गतीने व्हावी, यासाठी राज्य सरकारने राज्यात औरंगाबाद, धुळे, सोलापूर, नागपूर जीएमसी, मिरज आणि अकोला या सहा ठिकाणी नव्याने ‘व्हायरल रिसर्च अॅण्ड डायग्नोसिस लॅब’ला मान्यता दिली होती. लॅब उभारणीचे कामही वेगाने करण्यात आले. आठवडाभरातच यातील औरंगाबाद, धुळे आणि सोलापूर येथील लॅब सुरू करण्यात आल्यात; मात्र उर्वरित तिन्ही ठिकाणी ‘लॉकडाऊन’चा फटका बसला आहे. लॅबसाठी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे तसेच रसायने पुरविण्यासाठी पुरवठादारच उपलब्ध होत नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. जवळपास ३० ते ३५ प्रकारची रसायने असून, ही एका ठिकाणी उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शिवाय, ‘लॉकडाऊन’मुळे वाहतुकीचीही मोठी अडचण असल्याचे बोलल्या जात आहे. वेळेत पुरवठादार न मिळाल्यास तिन्ही ठिकाणी लॅबची प्रतीक्षा
नागपूरचा सप्लाय बंद!नागपूरस्थित ‘आयजीएमसी’तील ‘व्हीआरडीएल’ लॅबकडून अकोल्यासाठी आवश्यक रसायनांचा पुरवठा होणार होता; मात्र येथील पुरवठा बंद झाल्याने दिल्ली, बंगळुरू, हिमाचल प्रदेश या ठिकाणी रसायनांसाठी संपर्क साधावा लागत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली; मात्र पुण्यातील एका कंपनीमार्फत रसायने व उपकरणे मिळण्याची शक्यता असून, अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे वाहन पाठविण्यात आल्याची माहिती आहे. या कंपनीमार्फत आवश्यक रसायने मिळाल्यानंतरलॅब सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. तरच मिळणार टेस्टिंग करण्याची परवानगी!वैद्यकीय उपकरणे व रसायने उपलब्ध झाल्यानंतर अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह मिरज आणि नागपूर जीएमसीला ‘आयसीएमआर’कडे तयारीची मागणी करावी लागणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (एनआयव्ही) किटची मागणी करावी लागले. या किटच्या आधारे कोरोनाच्या संशयित रुग्णाचे नमुने तपासून त्याचा अहवाल ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात येईल. या परीक्षेत पास झाल्यावर ‘एनआयव्ही’ टेस्टिंगसाठी तिन्ही लॅबला परवानगी देईल.अद्यापही ‘बायोसेफ्टिक कॅबिनेट’चा पुरवठा नाही व्हीआरडीएल लॅबसाठी ३ लाखांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य खरेदी ही हाफकीनमार्फत केली जात आहे. त्यानुसार, अकोला जीएमसीने ‘बायोसेफ्टिक कॅबिनेट’सह इतर उपकरणांची हाफकीनकडे मागणी केली होती; परंतु हाफकीनकडून अद्यापही ही उपकरणे पुरविण्यात आली नाहीत.
लॅब उभारणीचे काम पूर्णत्वास आले आहे. लॅबसाठी आवश्यक उपकरणे व रसायने मिळविण्याचे काम सुरू असून, लवकरच लॅब सुरू करण्यात येणार आहे.- डॉ. नितीन अंभोरे, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख, जीएमसी, अकोला.