- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जगभर खळबळ माजविणाऱ्या कोरोना या आजाराची पहिली महिला संशयित रुग्ण अकोल्यात आढळताच मास्कसह हॅन्ड सॅनिटायजरची प्रचंड विक्री वाढताच मास्कचा आता तुटवडा निर्माण झाला आहे. आजारापासून सुरक्षितता ठेवण्यासाठी महत्त्वाचा असलेला एन ९५ मास्क ५०० रुपयांपेक्षा अधिक किमत दिल्यावरही मिळत नसून, २ प्लाय आणि ३ प्लाय मास्कही औषध दुकानांमध्ये मिळत नसल्याचे वास्तव आहे.कोरोना या आजाराने जगभर थैमान माजविले आहे. चीनपासून सुरुवात झालेल्या या आजाराचे काही संशयित रुग्ण देशात आढळल्यानंतर हळूहळू महाराष्ट्रातही या आजाराच्या संशयित रुग्णांचा शिरकाव झाला. त्यानंतर शनिवारी अकोल्यात दाखल झालेल्या एका २४ वर्षीय महिलेला कोरोना संशयित म्हणून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करताच जिल्हाभर खळबळ माजली. जर्मनीहून आलेल्या या २४ वर्षीय महिलेला सर्दी, ताप असल्याने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तिला कोरोनासारखी लक्षणे असल्याने तातडीने आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले.नागरिकांच्या मनात प्रचंड भीती असल्याने या आजारापासून वाचण्यासाठी जे काही आवश्यक आहे, त्या सर्व उपाययोजना करण्यात प्रत्येक व्यक्ती आटापिटा करीत असल्याचे वास्तव आहे.त्याचेच परिणाम म्हणून गरजेपेक्षा अधिक मास्क, हॅन्ड सॅनिटायजर याची खरेदी होत असल्याने सध्या जिल्हाभर या साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
३ रुपयांचा मास्क २० रुपयांत२ प्लाय आणि ३ प्लाय मास्कचाही सध्या चांगलाच तुटवडा असल्याने ३ रुपयांत मिळणारा २ प्लाय मास्क २० रुपयांमध्ये विकण्यात येत असून, ५ रुपयांचा ३ प्लाय मास्क सध्या ३० ते ४० रुपयांमध्ये विक्री करण्यात येत आहे. यासोबतच हॅण्डग्लोजचीही अशीच परिस्थिती होण्याची शक्यता औषध विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
हॅण्ड सॅनिटायजरचे दर गगनालाहॅण्ड सॅनिटायजर वापरण्याच्या सूचना शासनाने तसेच आरोग्य विभागाने करताच हॅण्ड सॅनिटायजर लीटरने विक्री होत आहे. त्यामुळे धास्तावलेले नागरिक अधिक प्रमाणात हॅन्ड सॅनिटायजरची खरेदी करीत असल्याने आता सॅनिटायजरचाही तुटवडा जाणवत आहे. खरेदी-विक्री वाढल्याने हॅण्ड सॅनिटायजरचे दर गगनाला भिडल्याचे वास्तव आहे.
आयात होणारे साहित्य मिळेनाचीनमधून आयात होणाºया वैद्यकीय क्षेत्रातील अनेक साहित्यांचा आता तुटवडा सुरू झाला आहे. यामध्ये कच्चा माल आणि तयार साहित्य असून, हॅन्डग्लोज, मास्कचा कच्चा माल, थर्मामीटर, पल्समीटर, एअर बेड, डायपर या साहित्यांचा समावेश आहे.
औषध दुकानदारांनी मास्क दडविले!एन ९५, २ प्लाय आणि ३ प्लाय मास्क मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत; मात्र काही पुरवठादार तसेच औषध व्यावसायिकांनी याचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याची माहिती आहे. कोरोनाची एवढी भीती नसतानाही मास्क वापरण्याचा आटापिटा करण्यात येत असल्याने सध्या जिल्हाभर मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे.
७० रुपयांचा मास्क ७०० रुपयांतएन ९५ हा मास्क ‘स्वाइन फ्लू’च्यावेळी वापरण्यात येत होता. आजारापासून सुरक्षितता देण्यासाठी हा मास्क योग्य असल्याने औषध दुकानामध्ये या मास्कची किंमत ७० ते ८० रुपये आहे; मात्र सध्या एन ९५ मास्कचा प्रचंड तुटवडा असल्याने हा मास्क तब्बल ७०० ते ८०० रुपयांना अकोल्यात विक्री होत असल्याचेही वास्तव आहे.