अकोला : मूर्तिजापूर येथील दोन्ही संशयित रुग्णांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर अकोट येथील एकाचा अहवाल प्रलंबित आहे. अशातच सोमवारी आणखी चार संशयित रुग्ण आयसोलेशन कक्षात दाखल झाल्याने एकूण संशयितांची संख्या 35 वर पोहोचली आहे. त्यापैकी ३० जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत.राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात तर दररोज संशयित रुग्ण दाखल होत आहेत; परंतु आतापर्यंत दाखल रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी दररोज संशयित रुग्ण दाखल होत आहेत; ही चिंता वाढवणारी बाब आहे. सोमवारी दाखल झालेल्याचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत, त्यामुळे आता तिघांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना योग्य सुरक्षा मिळत नसल्याने त्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
८२ लोक ‘होम क्वारंटीन’मधून मुक्तविदेशातून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांपैकी ८२ जणांचा होम क्वारंटीन पूर्ण झाल्याने त्यांना होम क्वारंटीनमधून मुक्त करण्यात आले आहे. तर ४४ जण अजूनही ‘होम क्वारंटीन’मध्ये आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष असले, तरी यातील बहुतांश लोक सोशल डिस्टंसिंग पाळत नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.