अकोला : कोरोनाचे विषाणू तपासणीसाठी अकोल्यात १२ एप्रिल रोजी विदर्भातील दुसरी ‘व्हीआरडीएल’ लॅब सुरू करण्यात आली. यांतर्गत आतापर्यंत अकोल्यासह बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील कोरोना संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये आता अमरावती जिल्ह्यातील कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांचीदेखील वैद्यकीय चाचणी करण्यात येत असल्याने अकोल्यातील लॅबवरील ताण वाढणार आहे.‘आयसीएमआर’च्या परवानगीनंतर १२ एप्रिल रोजी अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅब सुरू झाली. त्यामुळे अकोल्यासह वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांचीदेखील वैद्यकीय चाचणी अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅबमध्येच करण्यास सुरुवात झाली. परिणामी, अहवाल लवकर मिळण्यास मदत झाली असून, प्रलंबित अहवालांची संख्याही कमी झाली. अकोल्यातील लॅबमध्ये दिवसाला ८० स्वॅब तपासण्याची क्षमता आहे. त्यामुळे गत काही दिवसांमध्ये प्रलंबित अहवालांची संख्याही कमी झाली आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातीलही कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांची वैद्यकीय चाचणी आता अकोल्यातच होत असल्याने अमरावती येथील रुग्णांचे अहवाल लवकरच मिळण्यास मदत होईल.
नागपूरच्या लॅबवरील ताण कमीविदर्भात कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. अशातच या रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचा संपूर्ण ताण नागपूर येथील लॅबवरच येत होता. त्यामुळे अहवाल मिळण्यासही विलंब होत होता; मात्र अकोल्यातील लॅब सुरू झाल्यानंतर अकोला, बुलडाणा, वाशिम आणि आता अमरावती जिल्ह्यातील रुग्णांची चाचणी अकोल्यातच होत आहेत. त्यामुळे नागपूर येथील लॅबवरील चार जिल्ह्यांचा ताण कमी झाला आहे.