अकोला : जिल्ह्यात कोरोनाबाधितांमध्ये मृत्यूचा दर वाढत आहे. या मृतकांमध्ये कोरोनाशिवाय इतरही आजारांच्या समस्या असल्याचे आढळून आले आहे. अशा रुग्णांचे निदान वेळेत व्हावे, यानुषंगाने अकोल्यात शुक्रवारपासून ‘ट्रूनेट बिटा कोविड टेस्ट’द्वारे संदिग्ध रुग्णांचे निदान होणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या ‘आरटी-पीसीआर’ यंत्रणेद्वारे कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांची वैद्यकीय चाचणी केली जाते. या यंत्रणेद्वारे रुग्णाचा चाचणी अहवाल येण्यास आठ तासांचा वेळ लागतो; मात्र ज्या रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारखे आजार होते, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूवर अंकुश लावण्यासाठी अशा रुग्णांचे निदान वेळेत होणे गरजेचे आहे. शिवाय, गर्भवतींचेही निदान प्रसूतीनंतर होत असल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा धोका संभवू शकतो. कोरोनाचा हा संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टिकोनातून अशा अत्यावश्यक रुग्णांच्या वैद्यकीय तपासणीसाठी शुक्रवारपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच ‘ट्रूनेट बिटा कोविड टेस्ट’ घेण्यास सुरुवात केली जाणार आहे.अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातही यंत्रणा सज्जअकोल्यासह अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातही ‘ट्रूनेट बिटा कोविड टेस्ट’ यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. यासाठी आवश्यक यंत्रसामग्री गुरुवारी नागपूर येथून तिन्ही जिल्ह्यांत पोहोचविण्यात आली आहे.ही केवळ ‘स्क्रिनिंग टेस्ट’ ‘ट्रूनेट बिटा कोविड टेस्ट’ ही केवळ ‘स्क्रिनिंग टेस्ट’ असणार आहे. यामध्ये रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळल्यास त्याची ‘आरटी-पीसीआर’ यंत्रणेद्वारे पुन्हा एकदा चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून कोविड योद्ध्यांना संभाव्य संक्रमणाचा धोका टाळणे शक्य होणार आहे.
अकोल्यासह अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ‘ट्रूनेट बिटा कोविड टेस्ट’ची यंत्रणा प्राप्त झाली आहे. ही स्क्रिनिंग टेस्ट असून, आपत्कालीन रुग्णांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. एका तासात दोन अहवाल या माध्यमातून प्राप्त होणार आहेत. शुक्रवारपासूनच अकोला ‘जीएमसी’मध्ये ही यंत्रणा सुरू होणार आहे.- डॉ. रियाझ फारुकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा अकोला मंडळ, अकोला.