अकोला : अकोल्यात कोरोना संसगार्चा विळखा आणखीनच घट्ट होत असून, गुरुवार,४ जून रोजी आणखी ४६ रुग्णांची भर पडत एकूण बाधित रुग्णांची संख्या ७१२ झाली आहे. यापैकी ४८८ रुग्ण बरे झाल्याने सद्यस्थितीत १९० रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने गुरुवारी दिली.अकोला जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे अकोला जिल्हा सध्या कोरोनाचा विदभार्तील हॉटस्पॉट ठरला आहे. बुधवार, ३ जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ६६७ होती. यामध्ये गुरुवारी आणखी ४६ रुग्णांची भर पडून हा आकडा ७१२ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी १९३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित 147 अहवाल निगेटिव्ह आहेत.आज सकाळी प्राप्त अहवालात १९ महिला व २७ पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामध्ये ११ जण खदान येथील, सिटी कोतवाली भागातील नऊ जण, अकोट फैल येथील पाच जण, तारफैल येथील चार जण, न्यू तापडीया नगर येथील दोन, लकडगंज माळीपुरा येथील दोन जण, तर जठारपेठ, इराणीवस्ती जुनेशहर, फिरदौस कॉलनी, श्रेयानगर खडकी, गुलशन कॉलनी, जीएमसी क्वार्टर, वाडेगाव बाळापूर, देशमुख फैल, सोनटक्के प्लॉट, दिवेकर चौक, शास्त्रीनगर, टॉवर चौक, मोहतामिल गोरक्षण जवळ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
१० जणांना डिस्चार्ज
दुपारनंतर १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित तीन जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यात तीन महिला व सात पुरुष आहेत. हे रुग्ण महसूल कॉलनी येथील तीन, रामदास पेठ येथील दोन, न्यु राधाकिसन प्लॉट येथील दोन , तर तोष्णीवाल ले आऊट, कौलखेड, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे,अशी माहिती शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३४ वर गेली आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केलेली आहे. आतापर्यंत ४८८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापैकी बहुतांश जण घरी गेले आहेत. तर काही जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आता १९० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-७१२मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४८८दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १९०