अकोला : कोरोनाच्या संशयावरून शनिवारी संध्याकाळपर्यंत दाखल २७ जणांचा वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आला होता. त्यामुळे दिलासा मिळालेल्या अकोलेकरांना रविवारचा दिवस आणखी चिंता वाढविणारा ठरला आहे. रविवारी एका रुग्णाचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला असला तरी, आणखी दोन संशयित रुग्णालयात दाखल झाल्याने अकोलेकरांवरील धोका टळलेला नाही. त्यामुळे घराबाहेर पडण्याची खरेच गरज आहे का, असा प्रश्न प्रत्येकानेच स्वत:ला विचारण्याची गरज आहे.
‘सोशल डिस्टन्सिंग’ आहे; पण गर्दी किती करणार!काही अकोलेकर अतिशय सुज्ञ आहेत. त्यांच्या कृतीचे कौतुक केलेच पाहिजे; मात्र काही महाभागांना अजूनही भान नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शासनाने दिलेली सवलत लक्षात घेता या खरेदीच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नियम पाळला जातो. अकोल्याचा भाजी बाजारात त्यासाठी अंतर राखून रांगा लावण्यात आल्या; मात्र ‘सोशल डिस्टन्सिंग’ आहे, पण गर्दी किती करणार, याचाही प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.