- संतोषकुमार गवई लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पातूर-शिर्ला शिवारातील पाचशे एकरवरील ५० लाख रुपये उलाढालीचा फूलशेती व्यवसाय ‘लॉकडाऊन’मुळे धोक्यात आला आहे. तीनशे शेतकऱ्यांसोबतच सहाशे फूलशेती मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.पातूर-शिर्ला शिवारात सुमारे ३०० शेतकरी गुलाब, डिवाइन गुलाब, गॅलार्डिया, बिजली, लिली, निशिगंध, मोगरा आदींसह विविध रंगीबेरंगी फुलांचा ५०० एकर शेती क्षेत्रावर व्यवसाय करतात. यावर ३०० शेतकऱ्यांसोबतच सोळाशेपेक्षा अधिक कुटुंबांतील सदस्य, त्याबरोबरच सहाशेहून अधिक फूलशेती मजूर आणि त्यांचे तीन हजार लोकसंख्येचे कुटुंब एवढ्या लोकांची उपजीविका भागविली जात होती; मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारने संचारबंदी आणि ‘लाकडाऊन’ निर्णय उपरोक्त कुटुंबांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे या कुटुंबातील चार ते पाच हजार नागरिकांवर बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आली आहे.शासनाने विशेष पॅकेज देऊन दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. सध्या वर्षभरातून फेब्रुवारी ते मे महिन्यातच लग्नसराई असते. त्यामुळे सर्वाधिक विक्री याच काळात होत असते.अकोला शहरातील ८५ टक्के फुलांची बाजारपेठ पातूरच्या फूल उत्पादनावर अवलंबून आहे. त्यातून होणारी ५० लाख रुपयांची उलाढाल चार ते पाच हजार कुटुंबांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध करून देणारी आहे; मात्र गत २३ मार्चपासून हा व्यवसाय पूर्णपणे बंद पडल्याने ५० लाखांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
शासनाने ज्याप्रमाणे भाजीपाला आणि फळे यासाठी परवानगी दिली आहे, त्याचप्रमाणे फुलांसाठीसुद्धा परवानगी द्यावी, ‘लॉकडाऊन’मुळे फुलांचे उत्पादन घेणाºया शेतकºयांसह शेतमजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे.- उमेश फुलारी, फूल उत्पादक शेतकरी पातूर.