अकोला : एरव्ही घरी धुणे, भांडी व प्रसंगी स्वयंपाकासाठी नेमलेली मोलकरीण आली नाही, तर शेकडो गृहिणींचा जीव कासावीस होत असतो. महिला जर नोकरदार असेल, तर मोलकरीणचा तिला मोठा आधार वाटतो; मात्र कोरोनामुळे सगळी समीकरणेच बदलली आहेत. ज्या मोलकरणीची प्रतीक्षा केली जायची, त्याच मोलकरणीला कोरोना संपेपर्यंत येऊ नको, असे बजावले जात आहे. त्याचा फटका अकोल्यातील चार हजारांवर मोलकरणींच्या संसाराला बसला आहे. कोरोना महामारीच्या दुष्टचक्राने गत १५ दिवसांपासून मोलकरणींचे काम बंद झाले आहे. अनेकींचा मार्च महिन्याचा पगारही रखडला आहे. घरचे पुरुषही मोलमजुरी करणारेच. त्यामुळे मोलकरणींच्या कुटुंबाला अतिशय हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. घर कसे चालवावे, या विवंचनेत त्या सापडल्या आहेत.श्रमिक महिला मोलकरीण संघाच्या अध्यक्ष कल्पना शैलेश सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अनेक मोलकरणींच्या व्यथांना वाट मोकळी करून दिली. उमरी परिसरातील एक महिला पाच घरांचे धुणे-भांडे करीत असे; मात्र तिला आता त्या घरांमध्ये प्रवेशही नाही. कामाचे काय करायचे, हे विचारायला गेल्यावर तिच्यासाठी घराचा दरवाजाही उघडला नाहीच, वरून पगार नंतर देतो, असे सांगत तिची बोळवण केली. या मोलकरणींनी सुट्या घेतल्या तर पैसे कापले जातात व पगार आहे त्यापेक्षा कमी होतो. २२ मार्चपासून त्यांचेही काम बंद झाले आहे. शिवाय, मार्च महिन्याचा पगारही यात रखडला. घरमालकांनीही तो देण्याची तसदी घेतली नाही. घरात असलेला पैसा आणि धान्यही संपत आले आहे. किराणा दुकानदारांनी अधिक उधारी देण्यास नकार दिला आहे. ‘लॉकडाऊन’चा काळ पुढेही वाढणार असल्याचे दिसते. त्यामुळे आता उपाशी राहून जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. काही सामाजिक संस्थांनी अशा मोलकरणींना धान्याचा पुरवठा करू न दिलासा दिला आहे; मात्र भविष्याचे चित्र गंभीर असल्याचे कल्पनाताई यांनी सांगितले. काही घरमालकांनी पुढच्या महिन्याचा पगारही दिला व धान्यही देऊन आधार दिला आहे; मात्र ही संख्या फार कमी असल्याचेही त्यांनी सांगितले. काम संपले आहे. पैसा नाही आणि धान्यही नाही. काही दिवस उधार करून घर चालविले; पण आता तेही मिळणे थांबले. आता जगायचे कसे, हा मोठा प्रश्न मोलकरणींसमोर उभा ठाकला आहे.
पगार कापू नका!आपल्या घरी काम करणाऱ्या महिलांना कोरोनामुळे लागलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात सुट्यांचा पगार कापू नये, असे भावनिक आवाहन पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि अनेक संघटनांनीही केले आहे; मात्र या आवाहनाला फारसे कुणी गंभीरतेने घेतले नाही. मार्च महिन्याचा पगार देण्याची तसदीही काही घरमालकांनी घेतली नाही. एखादी सुटी पडली तरी त्याचाही पैसा कापला जातो. त्यामुळे ‘लॉकडाऊन’च्या काळात मोलकरणींचे काम बंद असले तरी पगार कापू नका, त्यांना मदत करण्याची गरज आहे.
शहरात नोंदणीकृत व अनोंदणीकृत मोलकरणींची संख्या मोठी आहे. हा प्रश्न केवळ अकोला शहराचाच नाही, तर जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये हेच चित्र आहे. ज्यांच्याकडे मोलकरणी आहेत, त्यांनी काम बंद केले आहे. अशा घरांतील लोकांनी मानवतावादी दृष्टिकोनातून संवेदनशीलपणे मोलकरणींना मदत केली पाहिजे. कोरोनाचे संकट हे सर्वांवर आहे; पण त्यातही आपण एकमेकांना आधार देण्याचे काम करावे.-कल्पना सूर्यवंशी, अध्यक्ष श्रमिक महिला मोलकरीण संघ